देवरूखला आजपासून राज्यस्तरीय निळू फुले करंडक

साडवली : (06 May 2010) मराठी सिने, नाट्य सृष्टीतील अजरामर व्यक्‍तीमत्व नटश्रेष्ठ निळू फुले यांना आगामी पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी येथील विकास प्रबोधिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नटश्रेष्ठ निळू फुले करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला उद्यापासून (ता. 7) सुरवात होत आहे. यानिमित्ताने निळू फुले यांच्यावरील "सिंहासन' या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. पित्रे प्रायोगिक कलामंचात रंगणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून 15 नामवंत नाट्यसंस्थांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन सायंकाळी 5.30 वाजता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याचवेळी सिंहासन या विशेषांकाचे प्रकाशन अप्पर पोलिस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योगपती बाळासाहेब पित्रे, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषद सदस्य बारक्‍याशेठ बने, देवरुखचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय नारकर आदी उपस्थित राहणार आहेत. 9 मे पर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार डॉ. नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नटश्रेष्ठ निळू फुले यांचा प्रथम स्मृतिदिन 25 जूनला आहे. त्यानिमित्ताने या कलाकाराला आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने प्रथमच या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन विकास प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे. यानिमित्ताने संगमेश्‍वर तालुकावासीयांना एकाचवेळी तीन दिवसात 15 दर्जेदार एकांकिका पाहण्याचा योग जुळून आला आहे. विकासप्रबोधिनीचे सर्वेसर्वा अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली युयुत्सु आर्ते, संदेश सप्रे, प्रमोद हर्डीकर, अंकुश खामकर, सौ. श्‍वेता भस्मे, निनाद जाधव, अजिंक्‍य जाधव, सचिन अपिष्टे, प्रभाकर डाऊल, नितीन हेगशेट्ये, अविनाश जाधव, प्रशांत हर्डीकर, संजय शिगवण, सुनील जाधव आदी कार्यकर्ते स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत. स्पर्धेचा शुभारंभ रत्नागिरी विभाग एसटी महामंडळाच्या वंशवेल या गाजलेल्या एकांकिकेने होणार आहे. त्यानंतर देवरूख हायस्कूलचे कलाकार आपली कला दाखवणार आहेत. त्यानंतर मुंबईची ओंकार आर्ट संस्था, रत्नागिरीची जिज्ञासा थिएटर्स, आणि मुंबईची प्रल्हाद कुरतडकर यांची एकांकिका पहिल्या दिवशी सादर होणार आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आणि राज्य पुरस्कार विजेते संजय जाधव, राजेश देशपांडे आणि चंद्रकांत देशपांडे यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय तीन दिवस मान्यवर परीक्षक म्हणूनही चित्रपट व नाट्यसृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत.

No comments: