ये स्वराज्य सिंहासनी | Ye Swarajya Sinhasani

ये स्वराज्य सिंहासनी
वीर नरमणी, धन्य ही अवनी
की उदंड झाले पाणी, आनंदवनभुवनी
शिवराय छत्रपति झाले

हे बारा मावळ आनंदाने न्हाले
चैतन्य अधिष्ठित झाले
मांगल्यच मिरवित चाले
पदि सुवर्ण पसरि मृणाले
जन उत्साहाने धाले
शिवराय छत्रपति झाले

दशदिशा करिती आरती
नक्षत्रे तारा तती
मंगलाक्षता उधळती
रविचंद्र निरांजन हाति घेउनि आले
शिवराय छत्रपति झाले

सुर सरिता सिंधू ब्रह्मपुत्र वरदायी
यमभगिनी यमुना पावन गंगामाई
धी राघव पदरज धूता शरयू येई
नर्मदा पयोष्णी घेउनि ये पुण्याई
भद्रावति चंद्रा वरदा पूर्णामाई
कावेरी गोदा तुजला मंगल गाई
त्या भिवरा भीमा शुभाशीश द्यायाही
ती वरदहस्तिनी तुझी भवानी आई
की मुळा मुठाही गहिवर भरुनी वाही
आनंद सोहळा बघुनी जीवन धाले
शिवराय छत्रपति झाले

तीर्थोदक शीर्षी भरली अमृतमाया
जल कलश करिति मधुपर्क तुला शिवराया
आसिंधुसिंधुपर्यंत कीर्त पसराया
अभिषेक कराया सातहि सागर आले
शिवराय छत्रपति झाले

ये अरुण अष्टदिक्‍पाल चामरे धरिती
नभछत्रमेघडंबरी धरी तुजवरती
नेत्रांचे कुतुहल दीप भवति झगमगती
कविभूषण चारण तव बिरुदावलि गाती
शिवराज सिंह हा गजेंद्र झुंडीवरती
घेताच झेप ते दास्य भिऊन पळाले
शिवराय छत्रपति झाले

नृप छत्र धरी शिवराय शिरी
नित ढाळित चामर चंद्र करी
गजराज डुले, चतुरंग दले
नर रत्‍नमणी लढती समरी
गिरिकंद गर्जित मुक्त स्वरे
वनराज निनादित दूर्ग दरी
समता ममता सुख मानवता
जनता तव ही जयकार करी
धन दौलत सुखवी नरा, माय लेकरा
प्रजेला थारा- भेद नच काही
सारेच सारखे पाही
हे उदंड झाले पाणी- लोक वाखाणी, सत्य हो वाणी
गो ब्राह्मण भू प्रतिपालक जगी अवतरले
स्वातंत्र्य रक्षण्या जाण द्यावया प्राण,
सज्‍ज संतान मराठी भाले
शिवराय छत्रपति झाले


गीतराजा बढे
संगीत
स्वर
गीत प्रकारस्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा

No comments: