मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा राजा अर्थातच ‘राजा गोसावी’.यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माणदेश भागातल्या सिद्धेश्वर कुरोली येथे 28 मार्च 1928 रोजी झाला.खरे तर त्यांना मराठीमधील डॅनी के असे म्हटले जाते. आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 100 चित्रपट व 50 च्यावर नाटकांतून अभिनय केला.
लहानपणापासून त्यांना नाटक सिनेमाचा नाद असल्याने ते मुंबई येथे पळून गेले व मास्टर विनायकांच्या घरी त्यांनी घरगड्याचे काम पत्करले. त्यामुळे त्यांचा चित्रपटसृष्टीतील लोकांचा संबंध आला व प्रफुल्ल पिक्चर्समधे त्यांनी आधी ऑफिसबॉयचे काम मिळवले. सुतारकाम, मेकअप मॅन, प्रकाश योजना अशी कामे करता करता ते ‘एक्स्ट्रा’ नट बनले. ते भानुविलास चित्रपटगृहात बुकिंग खिडकीवर सिनेमाची तिकिटेही विकायचे. त्याबरोबर ते दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ‘प्रॉम्प्टर’ म्हणून काम करू लागले व नाट्यसृष्टीशीही त्यांचा संबंध आला. ‘भावबंधन’ या नाटकात त्यांना रखवालदाराची भूमिका मिळाली, हीच त्यांची अभिनयाची सुरुवात होती. त्याचवेळी ते नाटकांची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत. ‘अखेर जमलं’ या चित्रपटापासून त्यांचा चित्रपट अभिनेते म्हणून श्रीगणेशा झाला.
पूर्ण नाव-राजाराम शंकर गोसावी
राजा गोसावी यांची नाटके (आणि त्यांतील भूमिका)
उधार उसनवार (भीमराव वाघमारे), एकच प्याला (तळीराम), करायला गेलो एक (हरिभाऊ हर्षे), कवडीचुंबक (पंपूशेट), घरोघरी हीच बोंब (दाजिबा), डार्लिंग डार्लिंग (प्रभाकर), तुझे आहे तुजपाशी (श्याम), नटसम्राट (गणपतराव बेलवलकर), नवरा माझ्या मुठीत गं, नवर्याला जेव्हा जाग येते (गोविंदा), पुण्यप्रभाव (नुपुर, सुदाम, कंकण), प्रेमसंन्यास (गोकुळ), भाऊबंदकी (नाना फडणीस), भावबंधन (रखवालदार, महेश्वर, कामण्णा आणि धुंडीराज), भ्रमाचा भोपळा (कचेश्वर), मेंढरं (प्रेस फोटोग्राफर), या, घर आपलंच आहे (गौतम), याला जीवन ऐसे नाव (नाथा), लग्नाची बेडी (अवधूत, गोकर्ण), वरचा मजला रिकामा (दिगंबर), शिवसंभव (इसामियाँ), संशयकल्लोळ (फाल्गुनराव, भादव्या), सौजन्याची ऐशी तैशी (नाना बेरके), हा स्वर्ग सात पावलांचा (डॉ. गात)
पुरस्कार आणि सन्मान
नटसम्राट मध्ये ’गणपतराव बेलवलकरांची’ भूमिका करण्याचा मान, 1995 साली बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हा सर्वोच्च सन्मान.
राजा गोसावी यांचे चित्रपट
अखेर जमलं, अवघाची संसार (1960), आंधळा मागतो एक डोळा, आलिया भोगासी, उतावळा नवरा, कन्यादान (1960), काका मला वाचवा, कामापुरता मामा (1965), गंगेत घोडं न्हायलं, गाठ पडली ठकाठका, गुरुकिल्ली (1966), चिमण्यांची शाळा (1962), देवघर, दोन घडीचा डाव, पैशाचा पाऊस (1960), बाप माझा ब्रह्मचारी (1962), येथे शहाणे राहतात (1968) लग्नाला जातो, लाखाची गोष्ट, वरदक्षिणा (1962), वाट चुकलेले नवरे (1964), सौभाग्य, हा खेळ सावल्यांचा
No comments:
Post a Comment