मकरंद, भरत, सिद्धार्थ बनणार बुटके!


मराठी चित्रपटसृष्टीत केवळ वेगळे विषयच नाहीत, तर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. काही निर्माते-दिग्दर्शक आपल्या चित्रपटात असा एखादा वेगळा प्रयोग करतात. दिग्दर्शक जय तारीनेदेखील आपल्या आगामी "आम्ही तीन बुटके' या चित्रपटात नवीन तंत्राचा वापर करून मराठीतील आघाडीचे कलाकार मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांना बुटके बनविण्याचे ठरविले आहे. या चित्रपटात हे तिन्ही कलाकार अवघे साडेतीन फुटांचे दाखविण्यात येतील.

हॉलीवूडमधील नवनवीन तंत्राचा वापर बॉलीवूडने नेहमीच केला आहे. काही हिंदी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या हॉलीवूडची बरोबरी करू लागले आहेत. त्यामध्ये आता आपली मराठी चित्रपटसृष्टीही मागे राहिलेली नाही. नवनवीन प्रयोग काही चित्रपटांत करण्यात आले आहेत. महेश कोठारे यांनी आपल्या "जबरदस्त' चित्रपटात "केबल'द्वारे "फाईटिंग'ची दृश्‍ये दर्शविली होती. नानूभाई यांनी आपल्या "बे दुणे साडेचार' या चित्रपटाचे शीर्षकगीत रेड नावाचा अद्ययावत कॅमेरा वापरून चित्रित केले होते. आता जय तारी या दिग्दर्शकाने आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांना साडेतीन फुटाचे बुटके बनविण्याचे ठरविले आहे. याबाबतीतील एक "ट्रायल' नुकतीच घेण्यात आली आणि विशेष म्हणजे ती यशस्वीही ठरली आहे. भरत आणि सिद्धार्थ यांना आधुनिक तंत्राद्वारे साडेतीन फुटाचे बुटके बनविले त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे हे बुटके रूप पाहण्यासारखे होते. सुरुवातीला आमच्या मनात कुतूहल दाटले होते; परंतु प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एक प्रकारची गंमत वाटली. "शोमन इंटरनॅशनल' या बॅनरद्वारे निर्माते मोहंमद फजी यांनी "आम्ही तीन बुटके' हा चित्रपट बनविण्याचे ठरविले आहे. ऑगस्टमध्ये हा चित्रपट सेटवर जाईल. या चित्रपटाच्या गाण्याचे "रेकॉर्डिंग' आता पार पडणार आहे. या साडेतीन फूट बुटक्‍यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी विनोदी शैलीत मांडण्यात आल्या आहेत. जितू नावाचा "स्पेशालिस्ट' या तीन कलाकारांना बुटके बनविणार आहे. मात्र या तंत्राबाबत काहीही माहिती देण्यास नकार देण्यात आला.

No comments: