"प्रतिसाद...'चे प्रदर्शन लांबले

मुंबई - ( 16 May 2010) कधी सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळण्यात येणारी अडचण; तर कधी निर्मात्याकडून वेळेवर आर्थिक पुरवठा न झाल्यामुळे बऱ्याचशा चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडू शकते; परंतु "प्रतिसाद...द रिस्पॉन्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 मे रोजी ठरलेली असताना तांत्रिक सोपस्कार वेळेवर न झाल्यामुळे आता तो चित्रपट 28 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ठरलेल्या तारखेच्या वेळी चित्रपट प्रदर्शित करण्यास निर्माते-दिग्दर्शक अपयशी ठरले आहेत. "अमर आदित्य प्रॉडक्‍शन' या बॅनरखाली होमिओपॅथीवर बनलेला हा एकमेव मराठी चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन योगेश दत्तात्रय गोसावी यांनी केले आहे. संदीप कुलकर्णी, नीलम शिर्के, किशोर कदम, सुनील तावडे, नीलांबरी आदी कलाकारांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. डॉ. विजयसिंह अमरसिंह निकम निर्माते आहेत. हा चित्रपट येत्या 21 मे रोजी प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार होता. त्याच्या भल्या मोठ्या जाहिराती त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये दिल्या होत्या. काही ठिकाणी पोस्टर्सदेखील लावली होती; परंतु चित्रपट सेन्सॉरकडे जाण्यास उशीर झाला आहे. त्याला कारण ठरले आहे ते काही तांत्रिक सोपस्कार. हा चित्रपट ठरल्या तारखेच्या वेळी प्रदर्शित करण्याचा निर्माता-दिग्दर्शकांनी चंग बांधला होता. तो वेळेत सेन्सॉरकडे जाऊन त्यांची मंजुरी मिळावी म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले होते; परंतु काही तांत्रिक सोपस्कार होण्यास बराच वेळ लागल्याने आता तो सोमवारी सेन्सॉरकडे पाठविण्यात येणार आहे आणि 21 मेऐवजी 28 मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. निर्मात्यांचा जाहिराती आणि अन्य प्रसिद्धीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे.

No comments: