अजय-अतुलने छेडला मराठी संगीताचा गजर



मुंबई -16/05/2010 "खेळ मांडला...', "साडे माडे तीन....', "मन उधाण वाऱ्याचे....' यांसारखी अस्सल मऱ्हाठमोळी गाणी सादर केली जात होती. प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा आणि शिट्यांचा कडकडाट होत होता. वन्स मोअर....वन्स मोअरची फर्माईश केली जात होती. प्रत्येक जण या तालासुरात न्हाऊन निघाला होता. निमित्त होते अजय-अतुलच्या कॉन्सर्टचे.
अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार अजय-अतुल कॉन्सर्टचा हा रंगतदार सोहळा काल झाला. त्याला रसिकांनी तुफान गर्दी केली होती.

"स्वाभिमान'च्या नीतेश राणे यांनी "पाणी वाचवा...मुंबई वाचवा' संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात सूत्रसंचालक मकरंद अनासपुरे पाणी वाचविण्याचा संदेश देत होता. त्याला उत्तम साथ अमृता खानविलकरची लाभली होती. मराठी संस्कृती व परंपरेला ताल, नाद आणि सुरात गुंफत अजय-अतुलच्या संगीताने सर्वांना बेभान केले. खरे तर अजय-अतुलच्या संगीताने केवळ मराठी रसिकांनाच नाही तर हिंदीमधील तमाम लोकांना मोहिनी घातली आहे. हिंदीमधील कित्येक गायक आज त्यांच्याकडे गाण्यासाठी उत्सुक असतात. कदाचित त्याचमुळे कालच्या सोहळ्याला हिंदीमधील कुणाल गांजावाला, शंकर महादेवन, हरिहरन यांनी हजेरी लावली होती. गणनायकाय गणाधीशाय...हे गाणे गाऊन शंकर महादेवनने गणेशाची आळवणी केली. त्यानंतर "मन उधाण वाऱ्याचे' हे गाणे गाऊन सर्वांना खुश केले. "जोगवा' चित्रपटातील "जीव रंगला...' या गाण्याने रसिकांना डोलायला लावले. कुणाल गांजावालाने "साडे माडे तीन', "वाऱ्यावरती गंध पसरला' ही गाणी गायली. अजय-अतुलने "नटरंग उभा', "खेळ मांडला' अशी गाणी गाऊन सर्वांची मने जिंकली. "आता वाजले की बारा'वरील अमृता खानविलकरचा तसेच "अप्सरा आली...' या गाण्यावरील सोनाली कुलकर्णीचा परफॉर्मन्स अप्रतिम ठरला. उत्तरोत्तर ही मैफल रंगत गेली आणि "मोरया मोरया' गाण्याने तिची सांगता झाली.

No comments: