बी. माजनाळकर यांचे निधन

07 May 2014 Kolhapur



मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते, दिग्दर्शक बंडोपंत श्रीपतराव तथा बी. माजनाळकर (वय ८४) (Bandopath Shripathrao Majnalkar) यांचे मंगळवारी (दि. ६ मे) पहाटे न्यू शाहूपुरीतील निवासस्थानी वार्धक्याने निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते. रविवारपासून त्यांची तब्येत बिघडली. अखेर मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सरस्वती टॉकीजमध्ये डोअरकिपर म्हणून काम करणारा एक मुलगा ते चतुरस्त्र विनोदी अभिनेता आणि कल्पक दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या बी. माजनाळकर यांच्या निधनाने मराठी सिनेमातील अनेक चढ-उतारांचा साक्षीदार हरपला अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंचगंगा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

माजनाळकर यांना सन २००६ साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रकर्मी’ पुरस्कार मिळाला होता. महामंडळाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.महाराष्ट्र फिल्म कंपनीतील अभिनेत्री कमलाबाई माजनाळकर यांचा मुलगा असलेल्या बी. माजनाळकर यांना म्हणून कंपनीत जाताना अभिनयात गोडी वाटू लागली. गरीब परिस्थितीमुळे त्यांना कोल्हापुरातील सरस्वती टॉकीजमध्ये डोअरकिपरची नोकरी पत्करावी लागली. नंतर भालजी पेंढारकर यांच्याकडे जयप्रभा स्टुडिओ आल्यानंतर राजा पंडित आणि द. स. अंबपकर यांच्या सहकार्याने माजनाळकर यांनी तेथे संकलन शिकण्यासाठी प्रवेश घेतला. भालजी पेंढारकर यांच्या तालमीत, सहवासात आलेल्या माजनाळकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. १९५७ साली ‘नायकिणीचा सज्जा’ या सिनेमाने त्यांना अभिनेता म्हणून पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर ‘पावनखिंड’, ‘आकाशगंगा’, ‘कन्यादान’, ‘अंतरीचा दिवा’, ‘वाघ्या मुरळी’, ‘येथे शहाणे राहतात’, ‘थापाड्या’, ‘चानी’, ‘वाघ्या मुरळी’ यांसह पावणेदोनशे सिनेमात त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून काम केले. माजनाळकर यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शनातही पाउल टाकले. तसेच काही नाटकातही त्यांनी भूमिका केल्या. माजनाळकर यांचा भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र संचलित ‘फिल्म अँड थिएटर अॅकॅडमी’च्यावतीने सत्कार करण्यात आला होता. त्यांनी ‘फिल्म अँड थिएटर अॅकॅडमी’त नवोदितांना प्रशिक्षणही देण्याचे काम केले.

Majnalkar was born in 1930 in Kolhapur. He was an actor, known for Aai Pahije (1988), Irasaal Karti (1987) and Maalmasala (1992). He died on May 6, 2014 in New Shahpur.

Debut film was Naikinicha Sajja in 1957.

No comments: