आज चांदणे उन्हात हसले | Aaj Chandane Unhat

आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्‍नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे !

भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतुन साकार जाहले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !

परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते करी कुंचले
रंगांतुन त्या चित्र रंगले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !

करात माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतुन झंकार उमटले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !

हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिर परंतू होता भवती
आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !


गीत–शान्‍ता शेळके
संगीत–सुधीर फडके
स्वर–आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट–कलंक शोभा
गीत प्रकार–चित्रगीत, युगुलगीत, कल्‍पनेचा कुंचला

No comments: