विठ्ठला कोणता झेंडा घेऊ | Vitthala Konata Zenda Gheu

जगन्याच्या वारीत मिळे ना वाट, साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं, आपलीच नाती.. तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचार्‍या जळति वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती?

बुजगावण्यागत व्यर्थ हे जगनं, उभ्याउभ्या संपून जाई
खळं रितंरितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे.. येगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती, विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती?


गीतज्ञानेश्वर मेश्राम
चित्रपटझेंडा
गीत प्रकारचित्रगीत

No comments: