चंद्राला देऊया गमतीची भेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
रॉकेट निघाले झू झू वरती
वार्याशी दोस्ती ढगांशी मस्ती
हवेला छेद ढगांना भेद
पृथ्वीच्या वेडाला चंद्राचा वेध
वर वर बघणारी वाकलेली मान
रॉकेटचा आकार होइ लहान लहान
आकाशात फुगली धूराची शेपटी
मागून निघाली बिचारी एकटी
आकाशी पाटीवर खडूची रेघ
सेकंदाला हजार मैल रॉकेटचा वेग
पृथ्वीची तोफ धूराचा गोफ
मोठ्या तू घेतली छोटिशी बुलेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
दूरवर कोठेही पृथ्वी दिसेना
चांदोबा कोणता तेही कळेना
आकाशात तिथे क्षितीज कक्षा
कक्षेच्या बाहेर गेल्यास भयंकर शिक्षा
आकाशात चार तास न थांबता भटक
नाहीतर शनीच्या कड्यांना लटक
गुरूच्या चंद्राच्या नागमोडी वार्या
प्लूटोला धरून मार सूर्याला फेर्या
दिव्याला घालवा ठाण्याला कळवा
रात्रीचं रॉकेटला जोरानं पळवा
घड्याळात पाचाचा लावावा गजर
सहाला आंघोळी आटपल्या तर
साताला भेटूया चंद्रावर थेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
रोबोट म्हणाला चला चहा प्या
पाठीवर ऑक्सिजनची नळकांडी घ्या
चंद्रावर जोरजोरात नका मारू हाका
चालताना छोटीछोटी पावले टाका
चंद्रावर थांबायचा नका करू हट्ट
चला चला चंद्र आला पट्टा करा घट्ट
पृथ्वीचा चंद्राशी होईल समेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
रॉकेटच्या बाजूच्या शिडीवर चढलो
चंद्रावर खाली उतरायला लागलो
ऊठ ऊठ ऊठ असा आरडाओरडा झाला
जोरजोरात हलल्याचा मला भास झाला
मला वाटलं चंद्रावर धरणीकंप झाला
मागोमाग बाबांचा आवाज कानी आला
इतक्या वेळ चंद्राचं स्वप्नं बघत होतो
मला काय ठाऊक झोपेमध्ये होतो?
पुन्हा एकदा बांबांचा आवाज कानी आला
अंगातला आळस माझा कुठच्या कुठे गेला
तुम्हालाही शाळेत जायला होईल की लेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
गीत | – | संजय उपाध्ये |
गीत प्रकार | – | बालगीत |
No comments:
Post a Comment