या बालांनो या रे या | Ya Balano Ya Re Ya

या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे ! मजा करा !
आज दिवस तुमचा समजा.

स्वस्थ बसे
तोचि फसे;
नवभूमी
दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया.

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहूबाजु भरे,
जिकडेतिकडे फुलें फळें,
सुवास पसरे, रसहि गळे.

पर ज्यांचे
सोन्याचे
ते रावे
हेरावे
तर मग कामें टाकुनियां
नवी बघा या ही दुनिया !

पंख पाचुचे मोरांना,
टिपति पाखरें मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.

चपलगती
हरिण किती !
देखावे
देखावे
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !


गीतफैयाज, वसंत देसाई
गीत प्रकारबालगीत
  टीप
• काव्य रचना- (प्रथमलेखन) १८९४ साल, (पुनर्लेखन) १९०१ साल.
• ‘पुंगीवाला’ हे छोटेखानी काव्य प्रख्यात आंग्लकवी Robert Browning यांच्या Pied Piper चे रूपांतर आहे. १८९४ साली भा. रा. तांबे यांनी देवासचे राजपुत्र श्रीमंत खासेराव पवार यांचे शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांस काव्याची अभिरुची लागावी म्हणून लिहिले.
• ‘पुंगीवाला’ या काव्यशृंखलेतून हे गीत अनेक क्रमिक पुस्तकांतून सुटंच घेतलं गेल्यामुळे एक स्वतंत्र कविता म्हणून वाचकांच्या परिचयाचं झालं आहे..
• मूळातील ‘या बालांनो’ ऐवजी ‘या बाळांनो’ आणि ’वनभूमी’ ऐवजी ‘नवभूमी’ असे उल्लेख पाठ्यपुस्तकांतून आढळतात.

No comments: