या भारतात बंधुभाव नित्य | Ya Bharatat Bandhu Bhav

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे
दे वरचि असा दे
हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे
मतभेद नसू दे

नांदोत सुखे गरीब, अमीर एकमतानी
मग हिंदु असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनि समुदाय-प्रार्थना
उद्योगि तरुण शीलवान दिसू दे
दे वरचि असा दे

हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खळनिंदका-मनीहि सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे

सौंदर्य रमो घराघरांत स्वर्गियापरी
ही नष्ट हो‍ऊ दे विपत्ती भीति बोहरी
तुकड्यास सदसर्वदा सेवेत कसू दे
दे वरचि असा दे


गीतराष्ट्रसंत तुकडोजी महाराज
संगीत
स्वर
गीत प्रकारस्फूर्ती गीत

No comments: